इतिहास

* विष्णुशास्त्री चिपळूणकर  , लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर,प्रा. नामजोशी या ध्येयवेड्या निष्ठावान व शिक्षणाविषयी तळमळ असणाऱ्या समाजसुधारकांनी, देशभक्तांनी ४ जानेवारी १८८१ रोजी पुण्यात मोरोबादादांच्या प्रशस्त वाड्यात  महिना वीस रुपये भाडेतत्वावर न्यू इंग्लिश स्कूल हि शाळा सुरु केली.   

* त्यानंतर १८९९साली सुरु झालेल्या लहान मुलांसाठीची आपली नवीन मराठी शाळा हि न्यू इंग्लिश स्कूलची शाखा अशी सुरवातीला ओळख होती. पण नंतर शाळेची लोकप्रियता वाढून विदयार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे 'नवीन मराठी शाळेला 'स्वतंत्र शाळेचा दर्जा देण्यात आला. 

* शाळेला मोरोबादादांचा वाडा अपुरा पडू लागल्यावर तेथून गद्रे वाड्यात व नंतर काही काळ होळकर वाड्यात शाळा भरू लागली. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णासाहेब हे शाळेचे पहिले शालाप्रमुख होते.

* प्रा. वा . ब . पटवर्धन , प्रा . गं. वा. लेले , प्रा. वि . ब . नाईक , प्रा . गो . चि . भाटे या शाळाप्रमुखांनी शाळेच्या विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. 

* इ . स . १९१४मध्ये प्रा. के. आर . कानिटकर हे शालाप्रमुख झाले . त्या वेळचे सरकारी अधिकारी लॉर्ड विलिंग्टन   यांनी शाळेला १,२५,००० रु . देणगी दिली.प्रा. कानिटकरांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या व इतर अनेक देणग्यांमधून १९१९ साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते शाळेच्या आजच्या इमारतीत कोनशिला समारंभ झाला . 

* सन  १९२१ मध्ये प्रा. वि . के. जोग हे शाळाप्रमुख झाले आणि १९२३ साली बांधकाम पूर्ण होऊन नवीन मराठी शाळा सध्याच्या  वास्तूत भरू लागली. प्रा. जोग यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या देणग्यांमधून १९२६ साली लेडी टाटा यांच्या हस्ते शाळेच्या नवीन सभागृहाचे उदघाटन झाले . 

*त्यानंतर शालाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्रा. रा. पु. शिंत्रे व प्रा न. गो. सुरु यांनीही बालकेंद्रित अभ्यासक्रमांचा पाठपुरवठा केला. १९३२ मध्ये श्रीमंत प्रतापसिंह महाराजांकडून देणगी मिळवली व त्यातुन विध्यार्थ्यांसाठी `श्रीमंत सयाजीराव गायकवाड 'वाचनालयाची इमारत उभी केली. त्यांच्याच काळात १९३६ साली बालक  मंदिराची सुरवात झाली .त्यानंतरच्या काळात प्रा. श्री. रा. पारसनीस व श्री. पु . वि साने यांनी शालाप्रमुख पदाची धुरा समर्थपणे पेलली. दानशूर उद्योगपती श्री. चं . गो. आगाशे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून श्री. पु. वि. साने यांनिविदयार्थ्यांसाठी  पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोठं `पुष्करणी ' म्हणजेच ' पाणघर ' उभारले. 

        शाळेतील हवेशीर मोकळे वर्ग , मोठे  फळे प्रशस्त मैदान , पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय स्वच्छ मुबलक स्वच्छतागृहे या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

शाळेची जुनी कचेरी ,मातीकाम वर्ग, हस्तव्यवसाय वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा पाडून इ.स. २००४ मध्ये तेथेे नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली.  
वाचनालय व पुष्करिणी या इमारती पाडून २०१४ साली डे. ए सोसायटीच्या इएमएसएम या शाळेच्या इमारतीची पायाभरणी झाली.  
१९६३ साली शालाप्रमुख झालेल्या श्रीम.लीलाताई गोखले यांनी न्या. माधवराव रानडे यांच्या सुपुत्राकडून डॉ. ना. मा.रानडे यांच्याकडून मिळालेल्या देणगीतून आजची न्या.रानडे बालक मंदिराची स्वतंत्र इमारत १९६५ साली बांधली.त्यांच्याच कारकीर्दीत १९७५ साली नवीन मराठी शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन व पाठबळ तसेच अनेक शिक्षक तज्ञ व थोर विचारवंतांच्या भेटीमुळे शाळेची कीर्ती जगभर पसरली. 
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सहभागातून वार्षिक स्नेहसंमेलन ही कल्पना मा. लीलाताई गोखले बाईंनीच रुजवली. शैक्षणिक भरीव कामगिरीमुळे १९७४ साली त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले गेले 
श्री. ना. ल . काळे , श्रीम. शैलजा पावगी, सौ. कल्पना आगवणे , सौ. उर्मिला उत्तेकर , सौ . पदमजा तपस्वी , सौ. मंदा अष्टेकर , सौ . सुप्रिया माजगावकर या मुख्याध्यापकांनी त्यांच्या धडाडी, कामाचा उरक , कल्पकता, नियोजनबद्धता इ . गुणांनी शाळा अधिकच नावारूपाला आणली. 

आंतरवर्गीय व आंतरशालेय सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन विद्यार्थी जसे भरपूर बक्षीस मिळवतात तसेच अनेक शिक्षकांनीही पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला आहे. सुशिला जोशी, कल्पना आगवणे, सुनीता जोशी, संघमित्रा बेंगळे , जयश्री लेले , सुनीता आगाशे , कल्पना वाघ यांना लोकनायक यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आनेसािमलाबाई परदेशी पुरस्कार पर्वत पार्वती बाई जगताप पुरस्कार नेस्पा पुरस्कार अनेक पुरस्काराने शिक्षक सन्मानित झाले आहेत. तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय पुरस्काराने मान लिलाताई गोखले, ताराबाई वैशंपायन, प्रतिभा पावगी व कल्पना आगवणे या गौरवान्वित आलेल्या आहेत.  

१९९५ साली शाळेत इयत्ता १ ली विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरू करण्यात आले हा उपक्रम नंतर तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवला.

२००४-०५ पासून इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण शाळेत दिले जाते. 

२००८-०९ पासून स्पोकन इंग्लिश व २०१०-११ पासून मौखिक संस्कृत हे नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवले जात आहेत .बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचे शारीरिक विकासासाठी अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणांबरोबर तायक्वांदो मल्लखांब व रोप मल्लखांबाचे शिक्षण वर्ग सुरू केले आहेत. 

सध्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यपिका सौ. कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये शाळेने १२५६ विदयार्थ्यांसह 'गीत रामायण' संगीत नृत्य नाट्य रूपात सादर करून 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया ' व ' वंडर बुक ऑफ लंडन ' हि दोन रेकॉर्डस् प्रस्थापित केली. या अभिमानास्पद कामगिरीमुळे शाळेचा नावलौकिकाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेले आहे.  

तसेच आधुनिक काळाची गरज ओळखून शाळेत उभारलेल्या ई - लर्निंग कक्षाचीही सर्व शिक्षक अध्ययन - अध्यापनासाठी वापर करतात. जानेवारी २०१९ मध्ये चार वर्गांमध्ये डिजिटल टीव्ही बसवण्यात आले आहेत.

शाळेची उभारलेली पुणे शहराचे प्रतिकृती म्हणजे पुणे दर्शन प्रकल्प पाहण्यासाठी इतर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी ही आवर्जून भेट देतात.  

२०१७-१८ या शैक्षणिक वर्गात शाळेत गणित प्रयोगशाळा उभारली.  

२०१८-१९ शैक्षणिक वर्गात संगीत वर्गाचे उद्घाटन शालेय परिसरातच ओपन जिम उभारली.  

कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही २०२०-२१ व २०२१-२२ यावर्षी मुलांचे शिक्षण व शालेय उपक्रम मायक्रोसॉफ्ट टीम्स वर ऑनलाईन स्वरूपात झाले.  

शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रातील उच्च पदांवर कार्यरत आहेत याचा शाळेला अभिमान आहे.  

कालरेषा डाउनलोड करा

इतिहास डाउनलोड करा